काही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेनंतर अचानक वातावरण बदलल्याने नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
देशातील हवामानात अचानक मोठा बदल होत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) 19 राज्यांसाठी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वादळी वाऱ्याचा इशारा जारी केला आहे. काही भागांमध्ये ताशी 85 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्तर भारत, मध्य भारत आणि पश्चिमेकडील अनेक राज्यांमध्ये पुढील 24 ते 48 तास हवामान अत्यंत अस्थिर राहू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशसह अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने विशेषतः झाडांखाली उभं न राहण्याचा, अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. किनारपट्टी भागांमध्ये मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये स्थानिक प्रशासन सतर्क करण्यात आलं असून आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस देशभरात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
