Employees’ Provident Fund Organisation म्हणजेच EPFO कडून कर्मचारी वर्गासाठी मोठा दिलासा देणारी सुविधा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नव्या EPFO 3.0 प्रणालीअंतर्गत PF खात्यातील पैसे थेट ATM आणि UPI च्या माध्यमातून काढण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या PF रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज, पडताळणी आणि मंजुरीसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते. मात्र नव्या डिजिटल प्रणालीमुळे ही प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि सोपी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सदस्यांना ATM कार्डसारखी सुविधा किंवा UPI आधारित प्रवेश दिला जाऊ शकतो.
माहितीनुसार, EPFO 3.0 अंतर्गत 95 टक्क्यांहून अधिक क्लेम ऑटो-सेटलमेंटद्वारे काही मिनिटांत मंजूर होऊ शकतात. Aadhaar लिंक असलेला UAN, KYC अपडेट आणि बँक खाते जोडलेलं असणं आवश्यक ठरू शकतं.
काही अहवालांनुसार, सदस्यांना PF रकमेपैकी ठरावीक मर्यादेपर्यंतच ATM किंवा UPI द्वारे पैसे काढण्याची परवानगी असेल. निवृत्ती निधी पूर्णपणे संपणार नाही यासाठी किमान काही रक्कम खात्यात राखून ठेवण्याचा नियम लागू केला जाऊ शकतो.
दरम्यान, EPFO कडून या सुविधेबाबत अंतिम अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी 2026 च्या मध्यापर्यंत ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
