देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे मतदार यादीतील त्रुटी दूर करून नव्या मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि माहिती अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः शहरी भागात स्थलांतरित नागरिक, दुबार नावे आणि चुकीची माहिती यामुळे मतदार यादीत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे आयोगाने नमूद केले.
या मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरांत जाऊन पडताळणी करणार आहेत. नागरिकांना मतदान ओळखपत्रातील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची नोंदणीही विशेष मोहिमेद्वारे केली जाणार आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या मोहिमेला विशेष महत्त्व दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय पक्षांनाही मतदार यादी तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, मतदारांनी वेळेत माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
