मतदार यादीत मोठी फेरतपासणी! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये SIR मोहिमेची निवडणूक आयोगाकडून घोषणा

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने देशभरातील मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी Special Intensive Revision (SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. या मोहिमेत महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करून नव्या मतदारांची नोंदणी आणि चुकीच्या नोंदी हटवण्याचे काम केले जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात SIR प्रक्रिया 20 जून 2026 पासून सुरू होणार असून अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यभरात जवळपास 97 हजारांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत.

या मोहिमेत आंध्र प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड, झारखंड, नागालँड, त्रिपुरा यांसह अनेक राज्यांचा समावेश आहे. तसेच दिल्ली, चंदीगड आणि दादरा-नगर हवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्येही ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदार यादीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर Booth Level Agent (BLA) नियुक्त करावेत. यामुळे मतदार नोंदणी आणि नाव वगळण्याच्या प्रक्रियेत अधिक स्पष्टता राहील.

दरम्यान, या मोहिमेअंतर्गत देशभरातील तब्बल 36 कोटींहून अधिक मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार असून लाखो अधिकारी आणि एजंट प्रत्यक्ष घरभेटी देणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *