राज्यात एकीकडे तीव्र उष्णतेची लाट कायम असताना दुसरीकडे काही भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उष्ण आणि दमट हवेमुळे वातावरणात मोठे बदल होत असून दुपारनंतर काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी या भागांमध्ये हवामान अचानक बदलू शकतं.
कोकण किनारपट्टी भागातही ढगाळ वातावरण तयार होत असून काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भरपूर पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.
हवामानातील या बदलामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेसोबतच वादळी पावसाचं दुहेरी संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
