नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया; कठोर कारवाईची मागणी

नाशिकमध्ये समोर आलेले भोंदू बाबा अशोक खरात यांचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. खरात यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण तसेच जमिनी बळकावल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, आणखी काही धक्कादायक आरोपांसह संबंधित पुरावेही पोलीस यंत्रणांकडे जमा झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्या काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही उघड झाले असून, पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “खरात यांच्याकडून घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.” तसेच, खरात स्वतःला अंकशास्त्रातील जागतिक स्तरावरील तज्ज्ञ म्हणून सादर करत होते, त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आदराने पाहत होते. मात्र, आता समोर येणाऱ्या माहितीवरून त्यांनी लोकांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याचेही केसरकर यांनी नमूद केले.

याशिवाय, या प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता कायद्याच्या चौकटीत निष्पक्ष कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *