इंधन साठेबाजीवर प्रशासनाचा कडक इशारा! बाटल्या आणि ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल घेणाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई : राज्यातील पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी नागरिक बाटल्या, कॅन आणि ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल भरून नेत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंप चालकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विनापरवाना मोठ्या प्रमाणात इंधन देऊ नये, असे स्पष्ट आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. विशेषतः प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरण्यावर बंदी असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने इशारा देत सांगितले की, कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी किंवा काळाबाजाराच्या उद्देशाने इंधन साठवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. काही ठिकाणी पोलिस आणि पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकांकडून पेट्रोल पंपांवर तपासणी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांब रांगा कायम असून, अनेक ठिकाणी “नो स्टॉक”चे फलक झळकत आहेत. सरकारने मात्र राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, घरगुती पातळीवर चुकीच्या पद्धतीने पेट्रोल साठवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *