तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून AIADMK पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील तीन बंडखोर आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडीमुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मदुरंथकमच्या मरगथम कुमारवेल, धारापूरमच्या पी. सत्यभामा आणि पेरुंदुराईचे एस. जयकुमार या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सादर केले. विशेष म्हणजे हे तिन्ही आमदार AIADMK मधील बंडखोर गटाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
राजीनाम्यानंतर या आमदारांनी अभिनेता-विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने ते लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी “हॉर्स ट्रेडिंग”चे आरोप करत सरकारवर निशाणा साधला आहे.
AIADMK प्रमुख एडप्पडी पलानीस्वामी यांनी या घडामोडींना “पूर्वनियोजित कट” असे संबोधत तीव्र प्रतिक्रिया दिली. पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी बंडखोरांवर टीका केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाने हे आरोप फेटाळून लावत आमदारांनी स्वेच्छेने निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.
या राजीनाम्यांमुळे AIADMK ची विधानसभा ताकद कमी झाली असून पुढील काही दिवसांत आणखी आमदारांची भूमिका बदलू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे.
