जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून या वाढीमागे मध्यपूर्वेतील वाढता तणाव प्रमुख कारण ठरत आहे. मध्यपूर्वमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूडची किंमत $110–$115 प्रति बॅरलच्या पुढे गेली असून काही सत्रांमध्ये ती $114 च्या वर पोहोचली आहे. यामुळे मागील काही वर्षांतील उच्चांकाजवळ किमती पोहोचल्या आहेत. विशेषतः Strait of Hormuz या महत्त्वाच्या मार्गावर तणाव वाढल्याने जागतिक तेलपुरवठा धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः इराणशी संबंधित लष्करी हालचाली आणि तेलसाठ्यांवरील हल्ल्यांमुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीत एका दिवसात 5 ते 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचेही समोर आले आहे.
या दरवाढीचा परिणाम भारतासारख्या आयात-आधारित देशांवर होण्याची शक्यता आहे. वाढत्या तेलदरामुळे महागाई वाढू शकते, तसेच रुपयावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही, तर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चांवर पुढील दिशा अवलंबून असेल.
