‘कॉकरोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धडाका! अवघ्या 4 दिवसांत BJP-Congressलाही मागे टाकलं; 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या आणि व्यंगात्मक राजकीय चळवळीची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘Cockroach Janta Party’ (CJP) नावाच्या या डिजिटल मोहिमेने अवघ्या काही दिवसांत इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून Instagram वर 1 कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळवत BJP आणि Congress सारख्या मोठ्या पक्षांनाही मागे टाकल्याचा दावा केला जात आहे.

ही चळवळ अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने सुरू केली असून ती सुरुवातीला एक व्यंगात्मक ऑनलाइन मोहिम म्हणून समोर आली होती. मात्र बेरोजगारी, महागाई, स्पर्धा परीक्षा आणि युवकांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या पोस्ट्समुळे Gen-Z आणि तरुण वर्गाने या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला. ‘Voice of the Lazy and Unemployed’ अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या या मोहिमेने काही दिवसांत लाखो सदस्य जोडल्याचे सांगितले जात आहे.

या पक्षाच्या नावामागेही एक वादग्रस्त पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान ‘कॉकरोच’ संदर्भातील वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच शब्दाचा वापर करून ही व्यंगात्मक डिजिटल चळवळ सुरू करण्यात आली. नंतर या मोहिमेचे मीम्स, व्हिडिओ आणि घोषवाक्य सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले.

दरम्यान, CJP चे X (पूर्वीचे Twitter) अकाउंट भारतात काही काळासाठी रोखण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ‘Cockroach is Back’ नावाने नवीन अकाउंट सुरू करण्यात आले आणि त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. संस्थापक अभिजीत दिपके यांनी अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा केला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ही केवळ इंटरनेटवरील मजेशीर ट्रेंड नसून तरुणांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक बनत चालली आहे. काहींनी याला “डिजिटल बंड” असेही संबोधले आहे. मात्र ही चळवळ पुढे प्रत्यक्ष राजकारणात उतरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *